आरोग्य विभागातील ‘ती’ भरती परीक्षा महिनाभरात
गैरप्रकारामुळे रद्द झालेली आरोग्य विभागाची बहुचर्चित परीक्षा पुन्हा घेण्याचे संकेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. ही परीक्षा महिनाभरात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ज्यांनी या परीक्षेसाठी आधी अर्ज केले होते आणि पैसे भरले होते, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गाच्या परीक्षा गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल ६ हजार २०५ पदांसाठी एकूण ८ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर लवकरच ही परीक्षा घेण्याची घोषणा तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे केली होती. मात्र, तब्बल २० महिन्यांपासून ही परीक्षा रखडली आहे. याबाबत राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दखल घेत येत्या महिन्याभरात सर्व आढावा घेऊन परीक्षेचे नियोजन जाहीर करणार असल्याचे सांगितले.
राज्यभरातील ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, अद्याप त्याबाबत काही निर्णय झालेला नाही. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पंढरपूर येथे विचारले असता, त्यांनी ही परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नव्हता, त्यांना या परीक्षेला अर्ज करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभाग गटनिहाय जागा
गट क – २७३९ जागा
गट ड – ३४६६ जागा
एकूण – ६२०५ जागा
अर्ज दाखल केलेले विद्यार्थी ८ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त