Take a fresh look at your lifestyle.

‘या’ उमेदवारांना आखाती देशात मिळणार नोकरी; बार्टीची माहिती

0

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना परदेशात रोजगाराची संधी मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) ‘ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्राम’ ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार २०२३-२४ मध्ये पहिल्या टप्प्यात ग्रामीण आणि शहरी भागातील पाचशे उमेदवारांना बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी ही माहिती दिली. विज्ञान तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल लक्षात घेता प्रगत, प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी मागणी निर्माण होणार असल्याने ‘बार्टी ने रोजगार स्वयंरोजगार, तसेच परदेशामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील २५ हजार उमेदवारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात पाच हजार

उमेदवारांना टाटा स्ट्राईव्ह, लर्नेट स्किल, आयसीआयसीआय स्कील अकॅडमी, राष्ट्रीय सुगीपश्चात काढणी तंत्रज्ञान संस्था, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, खादी व ग्रामोद्योग मंडळ, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती- तंत्रज्ञान संस्था अशा संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘बार्टी’च्या कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत गेल्या वर्षी तीन हजार १८० उमेदवारांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले.