Take a fresh look at your lifestyle.

गौरवास्पद ! अ‍ॅसिड हल्ल्यात 57 % अपंगत्व येऊन सुद्धा यशाचं शिखर गाठलेल्या यास्मिन मन्सूरी विषयी जाणून घेऊया

0

दिल्लीतल्या ‘एम्स’मध्ये यास्मिन मन्सूरी (Yasmin Mansorie) नावाची 33 वर्षांची एक नर्सिंग ऑफिसर कार्यरत आहे. हे वाक्य वाचून फारसं आश्चर्य वाटणार नाही. परंतु, त्या नर्सबद्दल अधिक माहिती मिळाली, तर मात्र नक्कीच आश्चर्य वाटेल आणि कौतुकही. यास्मिन ही देशातली पहिली अॅसिड सर्व्हायव्हर नर्सिंग ऑफिसर (First Acid Surviver Nursing Officer) बनली आहे. तिच्यावर अॅसिड हल्ला झाल्याने तिला 57 टक्के अपंगत्व आलं होतं. तरीही तिने सगळा त्रास सोसून जिद्दीने पाच सरकारी परीक्षा दिल्या, त्यात चांगलं यश मिळवलं आणि आता ती दिल्लीतल्या ‘एम्स’मध्ये (AIIMS, Delhi) नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. आहे की नाही आश्चर्याची, कौतुकाची आणि प्रेरक गोष्ट! ‘दैनिक भास्कर’ने यास्मिनची यशोगाथा प्रसिद्ध केली आहे.

उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) शामली (Shamali) इथलं हे कुटुंब. 2004 साली तिच्या कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्याने मत्सरबुद्धीने अॅसिड हल्ला केला. त्यात तेव्हा 16 वर्षांची असलेली यास्मिन आणि तिच्या बहिणीला सर्वांत जास्त जखमा झाल्या. त्यांची त्वचा इतकी जळली होती, की जखमेची खोली त्वचेच्या सर्वांत आतल्या, म्हणजे तिसऱ्या थरापर्यंत पोहोचली होती. त्या दोघांनी उपचारांसाठी दिल्लीत सफदरजंगमध्ये आणण्यात आलं. अॅसिडमुळे पडलेले ते डाग तर अजून गेलेलेच नाहीत. गेल्या 17 वर्षांत यास्मिनवर 20 सर्जरीज झाल्या असून, उपचार अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे हल्ला झाला तो दिवस काळा दिवस होता, असंच यास्मिन म्हणते; पण त्याचबरोबरच तो आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता, असंही ती म्हणते.

यास्मिनचे शब्द ऐकले, तर कठीण प्रसंगात तिने दाखवलेलं धैर्य पाहून कोणालाही प्रेरणा मिळेल. ती म्हणते, ‘तेव्हा मला आरशात पाहायला मनाई करण्यात आली होती. परंतु एकदा मी वॉशरूममध्ये गेले असताना आरशात पाहिलं, तर चेहऱ्यावर पट्ट्या बांधलेल्या दिसल्या. हात-पाय, चेहरा सगळंच जळलं होतं. अंगावर पाणी पडलं, तरी दुखायचं. मला वाटलं होतं, की आठवडाभर उपचार चालतील आणि मग आपण घरी जाऊ; पण नंतर तर महिन्यातून दोन आठवड्यांनी दिल्लीला जाण्याचं रूटीनच बनून गेलं. घरी गेल्यानंतर अनेकांनी तर असं बोलायला सुरुवात केली, की आता या मुलींशी लग्न कोण करणार? त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. त्यामुळे मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही खचले होते; पण तेव्हाच मी ठरवलं, की मला आयुष्य असंच घालवायचं नाहीये, मला चांगलं काही तरी करून दाखवायचं आहे’

लहानपणापासूनच यास्मिनला शिकण्याची आवड होती. खूप शिकून दिल्लीला जाऊन मोठी नोकरी मिळवायची असं स्वप्न तिने पाहिलं होतं. या हल्ल्याने तिच्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली; मात्र त्या राखेतून तिने जिद्दीने फिनिक्स पक्ष्यासारखी झेप घेतली. या हल्ल्यानंतर तिला 57 टक्के अपंग घोषित करण्यात आलं. तिच्या जखमा भरायला तब्बल दोन वर्षं लागली; पण काहीही झालं तरी शिकायचंच, असं तिने ठरवूनच टाकलं होतं. 10 वी, 12वीची परीक्षा तिने बाहेरून दिली. सर्जरीज वगैरे सुरू असताना मध्येच तिने कम्प्युटर कोर्स केला; पण कुठेही बाहेर गेलं तर तिचं जखमांनी भरलेलं शरीर पाहून कोणी घाबरायचं, तर कोणी रोखून पाहत राहायचं. त्यामुळे तिला खूपच विचित्र वाटायचं. तरीही तिने अभ्यासात मन रमवलं.

नंतर 2010 साली तिला दिल्ली विद्यापीठातत अॅप्लाइड सायकोलॉजीला प्रवेश मिळाला; पण इंग्लिश कच्चं असल्याने तिने ते सोडून बीएला प्रवेश घेतला. दरम्यान, नर्सिंगमध्ये चांगलं करिअर करता येईल अशी माहिती मिळाल्याने तिने बीएचं शिक्षण सुरूच ठेवून जामिया हमदर्द विद्यापीठात नर्सिंगला (Nursing) प्रवेश मिळवला. आर्ट्स बॅकग्राउंड असल्याने नर्सिंगला गेल्यावर बऱ्याच अडचणी आल्या. विज्ञान शिकावं लागलं आणि इंग्लिश त्यातही होतंच. मेहनत करूनही ती पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झाली; मात्र प्राचार्यांनी चांगलं सहकार्य केल्यामुळे आणि प्रोत्साहन दिल्यामुळे ती चांगली प्रगती करू शकली. 2014 साली कोर्स पूर्ण झाला, तेव्हा ती तिच्या बॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

या अभ्यासादरम्यान वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पाठवलं जातं. यास्मिनला जेव्हा सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं, तेव्हा तिला भीती वाटत होती. कारण तिच्यावर पहिल्यांदा उपचार तिथेच झाले होते. त्या आठवणी तिला नको होत्या. तिथे गेल्यावर तिथल्या एका नर्सने तिला ओळखलं आणि मग सर्वांनीच तिचं इतकं छान स्वागत केलं, की आपल्या नर्स होण्याच्या निर्णयाचा तिला अभिमान वाटला. तेव्हापासून आपण खऱ्या अर्थाने निर्भयपणे जगायला सुरुवात केली, असं यास्मिन सांगते.

हकीम अब्दुल हमीद सेंटेनरी हॉस्पिटलमध्ये तिला पहिली नोकरी लागली. तिथे दोन वर्षं काम केल्यानंतर तिने जनकपुरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोकरी केली आणि बेस्ट एम्प्लॉयी पुरस्कारही मिळवला. सरकारी नोकरी मिळवण्याची तयारीही तिने सुरू ठेवली होती. ‘एम्स’मध्ये भरती होणार होती; मात्र तिचा अर्ज स्वीकारला गेला नाही. कारण अपंग व्यक्तींच्या कोट्यात अॅसिड सर्व्हायव्हर्सचा समावेश नव्हता. म्हणून तिने दिल्ली हायकोर्टात खटला दाखल केला.

2016 साली डिसअॅबिलिटी अॅक्टमध्ये सुधारणा करून अॅसिड सर्व्हायव्हर्सनाही अपंग कोट्यातून भरती केलं जाऊ शकतं, असा बदल झाला होता. यास्मिनने कोर्टात खटला दाखल केल्यावर कोर्टाने एम्सच्या भरतीवर स्थगिती आणली. दोन वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर यास्मिनला एम्समध्ये नोकरी मिळाली आणि ती देशातली पहिली अॅसिड सर्व्हायव्हर नर्स बनली. आता तिला तिथे काम करून दोन वर्षं झाली आहेत.

या सगळ्या काळात पाच सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षा ती उत्तीर्ण झाली होती. नोकरी, कोर्टाच्या सुनावण्या, अभ्यास अशी सगळी तारेवरची कसरत तिने केली आणि त्याचं तिला फळही मिळालं. मेट्रो प्रवासातही तिने अभ्यास केला.

यास्मिन म्हणते, ‘सकारात्मक माणसांच्या सान्निध्यात राहावं. मी अशा चांगल्या व्यक्तींमुळेच आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. आपल्याला जो काही बदल घडवायचा असेल, तो फक्त अभ्यासातूनच घडू शकतो. म्हणूनच मी कधीच अभ्यास सोडला नाही. भारतात मुलगी कितीही शिकली, तरी कुटुंबाला तिचं लग्न हीच बाब सर्वांत जास्त महत्त्वाची वाटते आणि मुलगा सर्वांत सुपीरियर वाटतो. वास्तविक लग्न ही सर्वांत शेवटची गोष्ट असली पाहिजे. आधी मुलींनी आपली स्वप्नं पूर्ण करावीत.’

यास्मिनने हे स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध केलं आहे.

संदर्भ -नोकरी अड्डा