Take a fresh look at your lifestyle.

CET प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध; यावर्षी ‘इतक्या’ लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

0

मुंबई- व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा मे महिन्यात विविध सत्रांमध्ये पार पडत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी यंदा विक्रमी नोंदणी झाली आहे. ६ लाख १९ हजार ३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात पीसीबी ग्रुपसाठी २ लाख ९५ हजार ८४४ आणि पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख २३ हजार १८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी-सीईटी पीएसएम ग्रुपची परीक्षा येत्या १ मेपासून विविध सत्रात होत आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र सीईटी सेलने रात्री ८ पासून संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. पीसीएम ग्रुपसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी ९ मेपासून सुरू होणार असून, १३ मे रोजी संपणार आहे. तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ मेपासून सुरू होणार असून, २० मे रोजी संपणार आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी, प्रवेशपत्रावरील परीक्षेचा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी बाबी वाचून घेण्याच्या सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचण्याची दक्षता घ्यावी, विद्यार्थ्यांनी परीक्षेस जाताना प्रवेशपत्राबरोबरच स्वतःच्या मूळ ओळख प्रमाणपत्रासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून आणणे बंधनकारक असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तारीख आणि सत्र वेळ प्रवेशपत्रावर 

परीक्षा कालावधीत विविध सत्रांत परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सत्र आणि वेळा निश्चित करून तारीख आणि सत्र वेळांची माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र गुरुवारी रात्री ८ वाजता ऑनलाइन पद्धतीने देण्यात आल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.