महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जावर….
मागेल त्याला शेततळे योजनेच्या यशानंतर आता कृषी विभागाने मागेल त्याला फळबाग, ठिबक-तुषार, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट-हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन श्रेडर या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना याच पोर्टलद्वारे अनुदान वाटप होणार आहे. यामुळे शेतकरी लाभाच्या योजनांना गती मिळू शकेल.
शेतकऱ्यांना आवश्यक घटकांची मागणी केल्यावर तातडीने उपलब्धता झाल्यास नक्कीच शेती उत्पादनात वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती.
त्यालाच अनुसरून आता मागेल त्याला फळबाग, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, हरितगृह पेरणी यंत्रे शेततळ्याच्या अस्तरीकरण हे साहित्य उपलब्ध होणार असल्याने याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
सध्या सुरू असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागेल त्याला फळबाग देण्यात येईल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास एकात्मिक फलोत्पादन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन, बिरसा मुंडा कृषी क्रांती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेततळ्याचे अस्तरीकरण केले जाणार आहे. याच योजनांमधून मागेल त्याला शेडनेट व हरितगृह देखील मिळणार आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे साहित्य मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविली जाणार असून या बदलाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.