विद्यार्थ्यांना संधी; मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ‘या’ तारखेपर्यंत करता येणार
सामाजिक न्याय विभागामार्फत ऑनलाईन रीत्या राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज विहित कालमर्यादेत सादर करण्याचे जाहीर आवाहन
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्याथ्र्यांकरिता मॅट्रिकोत्तर उच्च शिक्षण घेता येण्याकरिता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांमार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासनपुरस्कृत भारत
सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचा समावेश आहे.
सदर योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइनरीत्या राबविण्यात येते. केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना ही केंद्र-राज्य यांच्याद्वारे संयुक्तिकरीत्या राबविण्यात येत असून त्यामध्ये केंद्र-राज्य हिस्सा ६०:४० असा आहे.
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल दि. ०१.१०.२०१८ पासून नव्याने कार्यान्वित झाले असून https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या विविध योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज नोंदणीकृत केले जातात. चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन नोंदणीकृत करण्याकरिता राज्य शासनांच्या महाडीबीटी पोर्टलवर दि. २१ सप्टेंबर २०२२ पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सद्यःस्थितीत महाडीबीटी पोर्टलवरील अहवालानुसार भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजने अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात सन २०२२-२३ मध्ये अनुसूचित जाती
प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ७८% एवढे पात्र अर्ज नोंदणीकृत झालेले आहेत. सदर बाब लक्षात घेता आणखी बऱ्याच विद्याथ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज नोंदणी केलेली नसल्याने ते योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
सबब शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये १००% ऑनलाइन अर्ज नोंदणीकृत होण्याकरिता व महाविद्यालय व जिल्हास्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत शासनस्तरावर आढावा घेण्यात येत आहे. तसेच शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या स्तरावर दर आठवड्याला सर्व जिल्ह्यांतील साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वार आढावा घेऊन सूचना देण्यात येत आहेत.

उपरोक्तप्रमाणे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची काळजी विभागामार्फत घेण्यात येत असून त्याच मोहिमेचा भाग म्हणून सदर आवाहनाद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करण्यासाठी त्रुटीपूर्तता करून अर्ज अंतिमरीत्या मान्यतेस्तव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रलंबित अर्जांचा निपटारा तात्काळ करावा. सदर योजनेअंतर्गत अर्ज
करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ सादर करावेत व तसे न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची तसेच अर्ज ज्या स्तरावर प्रलंबित आहे त्यांची राहील. सदरील प्रकरणी कोणतीही अडचण असेल तर संबंधितांनी जिल्ह्याचे साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याशी संपर्क साधावा.
सचिव
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ३२