अग्निवीर भरती प्रक्रियेत ‘हा’ बदल….
आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडून सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. अग्निवीर भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलवले जाणार असल्याचे रिक्रूटमेंट ऑफिसने स्पष्ट केले आहे.
कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार असून, एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

join indian army या संकेतस्थळावर ११ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची पडताळणी करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाईल.
लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्याबद्दलची माहिती उमेदवारांना त्या-त्या वेळी संकेत स्थळावरून मिळेल, असे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.