राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर, राज्य शासनाचा निर्णय
मार्डने पुकारलेल्या संपानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वरिष्ठ निवासी संवर्गातील 1 हजार 432 पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो रुग्णांना दिलासा मिळणार असून सद्यस्थितीत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांवरील ताण निम्म्याने कमी होणार आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती दोन दिवसांत करण्याचे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता केल्याने आता डॉक्टरांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांच्या निवासाची डागडुजी आणि पुनर्बांधणी तात्काळ करावी, अशी मागणी आता मार्डने केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील जवळपास 7 हजार निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. राज्याच्या आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्यात यावी ही देखील या डॉक्टरांनी प्रमुख मागणी होती.
संपादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टरांसोबत चर्चा करून दोन दिवसांत राज्यातील निवासी डॉक्टरांची 1432 रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला होता. त्यामुळे राज्य शासनाने आज ही रिक्त पदे भरण्याची घोषणा केलीय.