Take a fresh look at your lifestyle.

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ

0

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु अद्याप शाळांनी ऑनलाइन माहिती आणि आवेदनपत्र भरलेले नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा माहिती प्रपत्र, ऑनलाइन आवेदनपत्र आणि नियमित शुल्क ऑनलाइन भरण्याची मुदत २० डिसेंबर आहे. तसेच, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २१ ते २५ डिसेंबरपर्यंत, तर अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २६ ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. शाळांनी आपली माहिती आणि आवेदनपत्र मुदतीत भरावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी (दि.20/12/2022) अखेरची संधी मिळणार आहे. या मुदतवाढी संदर्भातील परिपत्रक आज विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.

परीक्षेविषयी अधिक माहिती https:/www.mscepuppss.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.