Take a fresh look at your lifestyle.

एरोस्पेस कंपनी करणार 2 हजार जागांसाठी भरती; इंजिनीअर्ससाठी सर्वात मोठी संधी

0

आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत फेसबुक, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि ट्विटर यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. सर्वाधिक कर्मचारी कपात ट्विटर आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांमध्ये झाली आहे. या दोन कंपन्यांतल्या हजारो कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे. याशिवाय, इतर काही कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. नोकरी गमावणाऱ्यांमध्ये इंजिनीअर्सची संख्या लक्षणीय आहे.

सर्वच प्रकारच्या अनेक इंजिनीअर्सच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या दरम्यान, भारतात मात्र नोकरीच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. महागाई आणि अमेरिकेतली मंदी यांसारख्या समस्यांमध्ये भारतीय आयटी क्षेत्रात दोन लाख नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी मिळेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.

त्यापाठोपाठ आता कॉलिन्स एरोस्पेस या मोठ्या बहुराष्ट्रीय संरक्षण कंपनीने भारतात नवीन दोन हजार नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केली आहे. ‘टेक गिग’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कॉलिन्स एरोस्पेसचे अध्यक्ष स्टीव्ह टीम म्हणाले, की ‘गेल्या 25 वर्षांपासून कंपनी भारतातल्या एरोस्पेस उद्योगासाठी वचनबद्ध आहे. स्थानिक बाजारपेठेत कंपनी दीर्घकालापासून इनोव्हेशन्स, आर अँड डी आणि एसटीईएम क्षेत्रातल्या संधींना थेट पुढे नेत आहे.

कंपनीने अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतांमध्ये 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणुकीचं नियोजन केलं आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात अतिरिक्त दोन हजार अति कुशल कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार कंपनी करत आहे.’