राज्यात प्राध्यापकांची २ हजार ८८ जागा भरण्यास मान्यता
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त आठ हजार पदांपैकी २ हजार ८८ जागा भरण्यास मान्यता दिली आहे. या भरतीनंतर आढावा घेऊन उर्वरित जागा भरतीस मान्यता देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मराठवाडा विद्यापीठास शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे आदींची उपस्थिती होती.
श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणीपासून छात्रवृत्ती देणे, उच्चशिक्षणाचा नवीन आकृतिबंध मातृभाषेतून शिक्षण यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.