Take a fresh look at your lifestyle.

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती; ‘हा’ नवीन बदल लागू होण्याची शक्यता

0

मुंबई:- जगभरात डिजिटल प्रणालीद्वारे पेमेंट करण्याचे चलन असल्याने भारतात देखील आर्थिक व्यवहार करायचे झाल्यास रोख रक्कम न बाळगता डिजिटल पेमेंट वॉलेट किंवा युपीआय पेमेंटच्या पर्यायाला अधिक पसंती देण्यात येते.

सध्या भारतात गुगल पे,फोन पे आणि पेटीएम द्वारे युपीआय पेमेंट करण्यावर अधिक भर देण्यात येत असताना अशा वापरकर्त्यांसाठी एक महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. भारतात बँकिंग व्यवहार करायचे झाल्यास पेमेंट हस्तांतरणावर मर्यादा घालण्यात आलेल्या असतात त्यामुळे प्रतिदिवशी ठराविक मर्यादेपर्यंत आर्थिक व्यवहार करण्याची मुभा दिली जाते. असाच काहीस प्रकार आता युपीआय पेमेंट करिता होणार असून, यावर काही प्रमाणात मर्यादा घालण्याचा सध्या विचार सुरु असल्याची माहिती आहे.

भारतात वापरल्या जाणाऱ्या युपीआय पेमेंट ॲप्सवर व्यवहाराची मर्यादा घालण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात असून याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत बोलणी सुरु असल्याचे समजते.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सध्या थर्ड पार्टी ॲप्सद्वारे केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारावर काही ठराविक मर्यादा लावताना या ॲप्सची व्हॉल्युम कॅप सुमारे ३० टक्के इतकी करण्याचा विचार करत आहे. सध्या सरकारचे वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यादरम्यान याबाबतीत चर्चा सुरु असून लवकरच याद्वारे काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर नव्याने याबाबतीत निर्णय घेण्यात आला तर गुगल पे, फोन पे इत्यादी ॲप्सद्वारे करण्यात येणाऱ्या युपीआय पेमेंट प्रणालीवर पेमेंट बाबतीत मर्यादा लागतील. हा निर्णय येत्या ३१ डिसेंबर पासून लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निर्णयामुळे येत्या काळात वापरकर्त्यांना युपीआय द्वारे इतरांना रक्कम पाठवताना देखील रक्कम हस्तांतरणाच्या मर्यादांचा सामना करावा लागू शकतो.