प्राचार्यांची 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी
राज्यात रिक्त असलेल्या प्राचार्यांच्या एकूण आठ हजार पदांपैकी 2072 पदे भरण्यासाठी अध्यादेश जारी करण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उर्वरित पदांबाबत सविस्तर आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बारामती मिशनवरही माहिती दिली. ते म्हणाले की, बारामतीमध्ये प्रथम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जातील आणि नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् जातील. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केवळ बारामती नाही तर, 16 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.
याच पद्धतीने याआधी सर्व मतदारसंघांवर उद्धवजींनी लक्ष केंद्रित केले असते तर, हे घडले नसते, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केले. ते केवळ राज ठाकरे यांना नाही तर, अनेक नेत्यांना भेटत असल्याचे सांगितले. देशात 144 लोकसभा मतदारसंघ असे आहेत, ज्या ठिकाणी भाजपाच्या जागा निवडून आल्या नाहीत. मात्र तिथे भाजपाचे उमेदवार निवडून येऊ शकतात, त्या जागांवर अधिक भर देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 2024 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.