विद्यार्थ्यांनो… परदेश शिष्यवृत्ती निवड यादी जाहीर
समाजकल्याण विभागाने अखेर छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीची निवड यादी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षणासाठीचा जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उशिरा का होईना निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेत नियोजित पदव्युत्तर पदविका, पीएच.डी.च्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता येणार आहे. तत्काळ निवड यादी प्रसिद्धी करावी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर समाजकल्याण विभागाने तातडीने हालचाल करत निवडयादी जाहीर केली आहे. विभागाकडून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती दिली जाते.

यंदा या शिष्यवृत्तीची निवडयादी ३० ते ३५ दिवस उशिराने जाहीर झाली आहे. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाला पोचण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणारच आहे.
आता विद्यार्थ्यांना व्हिसा, विमानप्रवासाचे तिकीट बुक करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच किमान निवडयादी लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाजकल्याण विभागाने पदव्युत्तर पदविका, पीएच.डी.चे परदेशात शिक्षणासाठी राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली जाते.