सेवानिवृतांना व त्यांच्या परिवाराला शासकीय रुग्णालयातून विनाशुल्क सेवा देण्याबाबत शासन निर्णय जारी
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयान्वये शासकीय रुग्णालयातून देण्यात येणा-या
विविध रुग्णसेवेकरीता आकारण्यात येणा-या शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तथापि या शुल्क आकारणीतून वरील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” येथील नमूद संवर्गातील व्यक्ती/लाभधारकांना रुग्णसेवा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शासकीय व जिल्हा परिषद निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या पती किंवा पत्नी यांचा समावेश या संवर्गात करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:- राज्य शासनाच्या विद्यमान निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणा-या शासकीय व जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारकांना आणि त्यांच्या पती किंवा पत्नीस सर्व शासकीय रुग्णालयात विनाशुल्क उपचाराची सवलत देण्यास या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहे. यास अनुसरुन;
(१) संदर्भाधीन क्रमांक १ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मधील शासकीय रुग्णालयात विनाशुल्क वैद्यकीय उपचारांची सवलत मिळत असलेल्या संवर्गाच्या यादीत अनुक्रमांक १६ येथे “शासकीय व जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या पती किंवा पत्नी” संवर्गाचा समावेश करण्यात येत आहे.
(२) प्रस्तुत सवलत हे आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून लागू राहील.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३८/०५/सेवा ५ व
क्र. ११/०५/व्यय-१३, दि.३०.३.२००५ अन्वये निर्गमित करण्यात आला आहे.