Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये २०० स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय

0

भंडारा- शासन स्तरावरुन शिक्षक भरती बंद आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी विशेष मंथन बैठक घेतली. यात तात्पुरत्या स्वरुपात शाळा व्यवस्थापन समितीद्वारे स्वयंसेवक नेमण्याचे ठरविले.


जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, उपाध्यक्ष तथा सभापती संदीप ताले, सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके,सभापती राजेश सेलोकर, सभापती स्वाती वाघाये विशेष मंथन बैठकीला उपस्थित होते. शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीद्वारे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांमधून २०० स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये एकूण २,६९२ पदे मंजूर असून २,३९२ शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.


उपक्रमाकरिता जिल्हा निधीच्या सर्व विभागातील तरतुदींमधून काही निधी कपात करुन या योजनेकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. शिक्षक भरती हा विषय शासनाचा असून, शिक्षक भरती न झाल्यामुळे गरीब, शेतकरी व मजूर वर्गाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापन समितीद्वारे मानधन तत्त्वावर स्वयंसेवक नेमणूक करण्याचा निर्णय मंथन बैठकीत घेण्यात आला. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता जि.प.स्वउत्पन्नातून मानधन तत्त्वावर स्वयंसेवक नेमणूक करण्याचा निर्णय घेणारी भंडारा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव जि.प. आहे, असे शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी सांगितले.