इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 3 हजार 451 कोटी रूपयांची तरतूद
मुंबई- राज्याचा अर्थसंकल्प हा कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग विकासाला चालना देणारा आहे.महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया इतर मागास बहुजन कल्याण विभाग,खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाचे संकट, निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली असतांनाही राज्याची विकासाची घोडदौड कायम आहे. कृषी व संलग्न क्षेत्राला या अर्थसंकल्पाने मोठा दिलासा दिला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग व मदत व पुनर्वसन विभागाला तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठीही या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली असून विकासाची पंचसूत्री चा अवलंब करून महाराष्ट्र राज्य हे प्रगतीपथावर जाईल अशी प्रतिक्रिया श्री. वडेट्टीवार यांनी दिली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा सर्वांगीण विकास
इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 3 हजार 451 कोटी रूपयांची तरतूद घोषित करण्यात आली आहे.महाज्योतीला 250 कोटी रूपये देण्यात आले आहेत. इतर मागासवर्गीय समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित आयोगाची स्थापना करण्यात येत आहे. या आयोगाला प्रशासकीय सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता 1 हजार 20 कोटी, शैक्षणिक व परीक्षा शुल्कासाठी 400 कोटी, सावित्रीबाई फुले मुलींच्या शिष्यवृत्तीकरिता 100 कोटी आणि आश्रमशाळांकरिता 400 कोटी रुपये घोषित करण्यात आले आहेत असेही श्री.वडेट्टीवार म्हणाले