माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रिल’मधून जनजागृती
१५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन
मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रिल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रिल अपलोड करता येणार आहे.मृद व जलसंधारण विभागाचे Instagram-https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en, Facebook-https://www.facebook.com/mahawalkathon2026/, Twitter https://x.com/MahaWalkathon26 हे सोशल मीडिया अकाऊंट आहेत.
स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रिल तयार करून आपल्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची आहे. रिलच्या सुरुवातीला रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे तसेच ‘#SaveSoilSaveWater’ हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.

स्पर्धेसाठी अधिकृत क्यूआर तयार करण्यात आला आहे. क्यूआर स्कॅन केल्यानंतर नोंदणी रिल लिंक सबमिट – जिल्हा निवड→व्हेरिफिकेशन→ सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे या विषयांवर रिल तयार करता येणार आहे.
स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, शॉर्ट फिल्म, बिफोर-आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स यांसारख्या सर्जनशील पद्धतींचाही वापर करता येणार आहे. मात्र रिलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे. स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता तसेच इन्स्टाग्राम एंगेजमेंट या निकषांवर करण्यात येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार नाही. तर संदेश महत्वाचा असणार आहे.
जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना ‘युवा मृद- जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
गजानन पाटील/विसंअ