Take a fresh look at your lifestyle.

गोठ्यातील पारंपरिक पशुपालनापासून प्रयोगशाळेतील भ्रूणनिर्मितीपर्यंत महाराष्ट्राच्या दुग्धव्यवसायाची नवी श्वेतक्रांती

0

हजारो वर्षांपूर्वी मानवाने जंगलातील प्राण्यांना आपल्या सहजीवनाचा भाग बनविले. शेती सुरू झाली, स्थिर वस्ती निर्माण झाली आणि त्याचबरोबर पशुपालनाची संस्कृती विकसित झाली. गाय, म्हैस यांसारखे प्राणी केवळ अन्नाचा स्रोत राहिले नाहीत; ते शेती, दूध, वाहतूक, खत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आधार बनले. त्या काळातील पशुपालकाला कोणते जनावर अधिक दूध देते, कोणते अधिक ताकदवान आहे किंवा कोणते वातावरणाशी जुळवून घेते, याचा अनुभवातून अंदाज घ्यावा लागत होता.

आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी पशुपालक अनुभवाच्या आधारे उत्तम जनावर निवडत होता; आज विज्ञान जनावराच्या आनुवंशिक गुणवत्तेचा अभ्यास करून पुढील पिढी कशी असावी, हे ठरविण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. हजारो वर्षांच्या पशुपालन परंपरेने आता प्रयोगशाळेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतली आहे. महाराष्ट्रातील दुग्धव्यवसायात लिंग निश्चित वीर्यमात्रा (Sex Sorted Semen-SSS) आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (Embryo Transfer Technology-ETT/IVF) यांचा वाढता वापर हा याच परिवर्तनाचा नवा अध्याय आहे.

अनुभवातून निवड ते विज्ञानातून निवड

भारतीय उपखंडात पशुपालनाची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. सिंधू संस्कृतीच्या काळातही गायी , म्हशी, यांसारखे पशू मानवी जीवनाचा भाग होते. नदीम्हशीच्या पाळीवीकरणाबाबतच्या आनुवंशिक अभ्यासांमध्ये तिचा उगम भारतीय उपखंडाशी जोडला जातो आणि तिच्या पाळीवी करणाची प्रक्रिया सिंधू संस्कृतीच्या उत्तर टप्प्यापूर्वी किंवा त्या आसपास सुरू झाल्याचे संकेत मिळतात.

त्या काळात उत्कृष्ट जनावरांची निवड ही निरीक्षण आणि अनुभवावर आधारित होती. ज्या गायी अधिक दूध देत, ज्या म्हशी निरोगी राहत किंवा ज्या पशूंची संतती चांगली होत, त्यांचे संगोपन केले जात असे. पिढ्यान्‌पिढ्या अशा निवडीमधून स्थानिक पशुधनाच्या विविध जाती आणि प्रकार विकसित झाले.

आज त्याच प्रक्रियेला विज्ञानाने नवी दिशा दिली आहे. अनुवंशिक गुणवत्ता आता केवळ बाह्य रूप किंवा अनुभवावरून ठरवली जात नाही; निवडक पैदास, वीर्यमात्रा, भ्रूण आणि आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च गुणवत्तेची पुढील पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पारंपरिक गोठ्यातील एक वासरू ते प्रयोगशाळेतून अनेक उच्च गुणवत्तेची वासरे

नैसर्गिक पद्धतीत किंवा पारंपरिक प्रजनन पद्धतीत एका गायीपासून साधारणपणे वर्षाला एक वासरू मिळते. त्यामुळे एखाद्या अत्यंत उच्च गुणवत्तेच्या दाता गाईचे आनुवंशिक गुण पुढील पिढीत मोठ्या प्रमाणात नेण्यासाठी अनेक वर्षे लागतात.
याच ठिकाणी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान मोठा बदल घडवते. उच्च अनुवंशिक गुणवत्ता असलेल्या दाता गाईच्या स्त्रीबीजांचे संकलन करून प्रयोगशाळेत निवडक उच्च गुणवत्तेच्या वळूच्या वीर्याने फलन केले जाते. त्यातून तयार झालेला भ्रूण प्राप्तकर्ता गाय किंवा म्हशीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे एका उच्च गुणवत्तेच्या दाता गाईच्या आनुवंशिक क्षमतेचा मोठ्या संख्येने पुढील पिढीत प्रसार करणे शक्य होते.

या तंत्रज्ञानामुळे एका उच्च गुणवत्तेच्या दाता गाईपासून वर्षभरात ४० ते ५० उच्च दर्जाची वासरे मिळविण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. म्हणजेच, पूर्वी एका उत्कृष्ट गाईची गुणवत्ता एका वासरापुरती मर्यादित राहायची; आता त्याच आनुवंशिक क्षमतेचा अनेक वासरांमध्ये प्रसार करता येतो. याच अर्थाने ETT/IVF हे पशुपालनातील ‘टेस्ट ट्यूब बेबी’ तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते.

नर की मादी? आता निवडीला विज्ञानाची जोड

पशुपालकाच्या दृष्टीने दुग्धव्यवसायात मादी वासराला विशेष आर्थिक महत्त्व आहे. पारंपरिक कृत्रिम रेतनात नर किंवा मादी वासरू जन्मण्याची शक्यता साधारण ५०:५० असते. मात्र, लिंग निश्चित वीर्यमात्रा म्हणजे Sex Sorted Semen तंत्रज्ञानामुळे मादी वासरू जन्मण्याची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते. या प्रक्रियेत मादी संततीसाठी आवश्यक ‘X’ गुणसूत्र असलेले शुक्राणू निवडून वीर्यमात्रा तयार केली जाते. यामुळे गोठ्यात दूध उत्पादनासाठी उपयुक्त कालवडींची संख्या वाढविण्याची संधी मिळते. उच्च वंशावळीच्या वळूची वीर्यमात्रा वापरल्यास अधिक दूध उत्पादनक्षम कालवडी मिळण्याची शक्यता वाढते. त्याचवेळी नर वासरांच्या संगोपनावरील अनावश्यक खर्चात बचत होऊ शकते.

मात्र हे तंत्रज्ञान सर्वच जनावरांसाठी सरसकट वापरण्याऐवजी सुदृढ कालवडी तसेच प्रथम किंवा द्वितीय वेतातील निरोगी गाई-म्हशी, योग्य माजाची वेळ आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय मार्गदर्शन यांचा विचार करून वापरणे आवश्यक आहे. कारण सेक्स सॉर्टेड वीर्यमात्रेतील शुक्राणूंची संख्या तुलनेने कमी असल्याने सामान्य वीर्यमात्रेपेक्षा गर्भधारणेचे प्रमाण काहीसे कमी असू शकते.

‘वंश जपणे’ ते ‘वंश सुधारणा’

प्राचीन पशुपालकासाठी आपल्या परिसरातील पशुधनाची जात आणि गुणधर्म टिकविणे महत्त्वाचे होते. आधुनिक पशुविज्ञान त्यापुढे जाऊन वंशसंवर्धनासोबत अनुवंशिक सुधारणा करण्याची संधी देत आहे. गिर, साहिवाल, थारपारकर या राष्ट्रीय जातींसोबत महाराष्ट्रातील खिलार, डांगी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ या गोवंशांच्या तसेच नागपुरी, मराठवाडी आणि पंढरपुरी म्हशींच्या संवर्धनासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे.
याचा अर्थ केवळ अधिक दूध देणारे पशुधन तयार करणे एवढाच नाही. स्थानिक हवामानाशी जुळणारे, रोगप्रतिकारक क्षमता असलेले, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चांगली दूध उत्पादनक्षमता असलेले पशुधन निर्माण करणे, हा या तंत्रज्ञानाचा व्यापक उद्देश आहे.

महाराष्ट्राची प्रयोगशाळेतून श्वेतक्रांतीकडे वाटचाल

महाराष्ट्रात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या वापरात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून १४,६९८ भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले असून त्यातून २,४७३ उच्च गुणवत्तेच्या वासरांचा जन्म झाला आहे.
पुण्यातील ताथवडे येथील बाह्यफलन व भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा मार्च २०२१ पासून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या अंतर्गत कार्यरत आहे. आतापर्यंत येथे २४० OPU सत्रे पूर्ण झाली असून ७८० भ्रूण तयार, ५५६ भ्रूण प्राप्तकर्ता जनावरांमध्ये प्रत्यारोपित आणि १५० भ्रूण गोठवून ठेवण्यात आले आहेत.

जुलै २०२६ पर्यंत या तंत्रज्ञानातून ६३ वासरांचा जन्म झाला असून ५० हून अधिक गाभण जनावरांकडून पुढील वासरांच्या जन्माची अपेक्षा आहे.
ताथवडे प्रयोगशाळेतील कामगिरीतील एक विशेष टप्पा म्हणजे २३ जुलै २०२२ रोजी ‘शीतल’ या देशातील पहिल्या पंढरपुरी म्हशीच्या बछडीचा भ्रूण प्रत्यारोपणातून झालेला जन्म. तसेच, मुऱ्हा म्हशीमध्ये एकाच स्त्रीबीज संकलनातून चार रेडकांचा जन्म झाल्याची नोंदही या क्षेत्रातील महत्त्वाची उपलब्धी आहे.

महागडे तंत्रज्ञान पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा प्रश्न त्याची किंमत असतो. म्हणूनच संशोधन प्रयोगशाळेत निर्माण झालेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष पशुपालकाच्या गोठ्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. लिंग निश्चित वीर्यमात्रेचा मूळ खर्च साधारण रु. १,२०० ते रु. १,५०० असताना महाराष्ट्र शासनाने संबंधित कंपन्यांशी करार करून ती रु. ५७५ प्रति मात्रा या दराने उपलब्ध करून घेतली आहे. केंद्र शासनाचे ४५ टक्के, राज्य शासनाचे ३० टक्के अनुदान आणि MahaLDB/सहकारी दूध संघामार्फत रु. १०० मदत अशा सवलतींमुळे पशुपालकांना ही वीर्यमात्रा अवघ्या रु. ८१ प्रति मात्रा या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत सुमारे ३.६६ लाख वीर्यमात्रांचे वितरणझाले आहे. याचबरोबर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत स्वदेशी सेक्स सॉर्टेड सिमेन तंत्रज्ञान विकसित होत आहे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ आणि NDDB यांच्यातील सामंजस्य करार अंतिम टप्प्यात असून, भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी कमी दरात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

गोशाळेतील कमी उत्पादनक्षम गायही आता ‘प्राप्तकर्ता’

आधुनिक तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे उच्च अनुवंशिक गुणवत्तेचे भ्रूण वाढविण्यासाठी प्रत्येक जनावर उच्च गुणवत्तेचे असणे आवश्यक नाही.
कमी दूध देणाऱ्या किंवा स्थानिक गाई-म्हशींचा प्राप्तकर्ता/दायी जनावर म्हणून उपयोग करता येतो. म्हणजेच, एखाद्या गोठ्यातील कमी उत्पादनक्षम जनावरालाही उच्च गुणवत्तेच्या वासराच्या जन्मप्रक्रियेत सहभागी करून घेता येते.
दि. ५ ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार गोशाळा आणि सामान्य पशुपालकांनाही हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. भ्रूण प्रत्यारोपणातून निरोगी वासराचा जन्म झाल्यास संबंधित पशुपालक किंवा गोशाळेला रु. १० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येते. त्यामुळे पशुधन संवर्धनासोबत ग्रामीण भागात अतिरिक्त उत्पन्नाचा मार्गही निर्माण होत आहे.

प्रत्येक महसुली विभागात प्रयोगशाळा

तंत्रज्ञानाचा लाभ काही मोजक्या केंद्रांपुरता मर्यादित न ठेवता तो राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्येक महसुली विभागात भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ताथवडे येथील प्रयोगशाळा कार्यान्वित असून मुंबई विभागासाठी पेण, नागपूरसाठी हेटीकुंडी, छत्रपती संभाजीनगरसाठी हरसूल, नाशिकसाठी लोणी बुद्रुक आणि अमरावती विभागासाठी जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, अकोला येथे प्रयोगशाळा उभारण्याची कार्यवाही सुरू आहे.
यामुळे प्रयोगशाळा आणि पशुपालक यांच्यातील अंतर कमी होणार आहे.

१०० टक्के अनुदानातून तंत्रज्ञानाची दारे खुली

आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ आर्थिकदृष्ट्या सक्षम पशुपालकांपुरता मर्यादित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत पात्र पशुपालकांना ETT आणि SSS या दोन्ही तंत्रज्ञानाचा लाभ १०० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गतही पशुपालकांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत.
यामुळे तंत्रज्ञान हे केवळ प्रयोगशाळेतील संशोधन न राहता प्रत्यक्ष ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे.

हजारो वर्षांची परंपरा, आता नव्या विज्ञानाच्या हातात

भारतातील पशुपालनाची कहाणी ही माणूस आणि पशू यांच्या सहजीवनाची कहाणी आहे. हजारो वर्षांपूर्वी पशुपालकाने आपल्या अनुभवातून चांगली गाय, चांगली म्हैस किंवा चांगली शेळी निवडली. पिढ्यान्‌पिढ्या त्या निवडीमधून पशुधनाच्या विविध जाती विकसित झाल्या. आज त्याच निवडीला आनुवंशिक विज्ञान, कृत्रिम रेतन, सेक्स सॉर्टेड सिमेन, OPU, IVF आणि भ्रूण प्रत्यारोपण यांची जोड मिळाली आहे.

पूर्वी “चांगले जनावर कोणते?” हा प्रश्न अनुभवातून सोडविला जात होता.आज “चांगल्या जनावराची आनुवंशिक गुणवत्ता पुढील पिढीत अधिक प्रभावीपणे कशी पोहोचवायची?” याचे उत्तर विज्ञान देत आहे.
पूर्वी एका उत्कृष्ट गाईकडून वर्षाला एक वासरू मिळणे ही नैसर्गिक मर्यादा होती. आज त्याच उच्च गुणवत्तेच्या दाता जनावराच्या आनुवंशिक क्षमतेचा अनेक वासरांमध्ये प्रसार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
पूर्वी पशुपालकाला नर किंवा मादी वासराच्या जन्माची प्रतीक्षा करावी लागत होती. आज लिंग निश्चित वीर्यमात्रेमुळे मादी कालवडींची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
आणि पूर्वी उत्कृष्ट वंशाची एखादी गाय किंवा म्हैस ही त्या एका गोठ्याची संपत्ती होती; आज तिच्या आनुवंशिक गुणवत्तेचा प्रसार संपूर्ण पशुधन क्षेत्रात करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
हीच पारंपरिक पशुपालनापासून आधुनिक पशुविज्ञानापर्यंतची खरी झेप आहे.
म्हणून महाराष्ट्रातील श्वेतक्रांतीचा पुढील टप्पा केवळ जनावरांची संख्या वाढविण्यात नाही, तर उत्तम अनुवंशिक गुणवत्ता, अधिक दूध उत्पादन, निरोगी पशुधन, कमी खर्च आणि पशुपालकाचे वाढते उत्पन्न यात आहे.

गोठ्यातील पारंपरिक पशुपालनाची हजारो वर्षांची परंपरा आता प्रयोगशाळेतील अत्याधुनिक विज्ञानाशी जोडली जात आहे. पशुपालकाच्या अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ देऊन महाराष्ट्राच्या दुग्धव्यवसायाला अधिक उत्पादक, लाभदायक आणि शाश्वत बनविण्याच्या दिशेने ही नवी श्वेतक्रांतीची वाटचाल आहे.

(माहिती मुख्य स्रोत :- पशुसंवर्धन विभाग )

युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे