Take a fresh look at your lifestyle.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानातून राष्ट्रप्रेमाचा जागर

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ९ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रभात फेरीचे आयोजन

0

मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा‘ अभियानांतर्गत विशेष प्रभात फेरीचे आयोजन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ९.३० या वेळेत भारतीय विद्या भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई या मार्गावर करण्यात आले आहे. या प्रभात फेरीत नागरिक, युवक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था आणि सांस्कृतिकप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या हाकेमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा मिळाली. ऑगस्ट क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, संघर्ष, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा ऐतिहासिक दिवस आहे. या दिवसाचे स्मरण करत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करणे; तसेच प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे, हा या प्रभात फेरीमागील प्रमुख उद्देश आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा, तिरंग्याविषयी आदर आणि राष्ट्रीय अस्मितेची भावना अधिक बळकट व्हावी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण भावी पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीपर जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, ऑगस्ट क्रांतीचे महत्त्व, तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जनमानसात अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

सदर प्रभात फेरीचे आयोजन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. मुंबई व परिसरातील नागरिक, युवक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सांस्कृतिकप्रेमींनी या प्रभात फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘हर घर तिरंगा’ अभियान अधिक प्रभावी बनवावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

 

संजय ओरके/ वि.सं.अ.