पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
आधार प्रमाणीकरण व अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करा; अन्यथा कर्जमुक्तीची लाभ मिळणार नाही – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. २७ : राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत सोमवार दुपारी १२ वाजे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ८४७ शेतकऱ्यांची लाभार्थी यादी अपलोड करण्यात आली आहे. यापैकी ९९ हजार ५४ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून, केवळ १४ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी सोमवार दुपार १२ पर्यंत पूर्ण झाली आहे. तर ८५हजार ५४ पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही.
त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण व अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हयातील कर्जमुक्तीचा आढावा घेतला. आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, तसेच ते पुन्हा नव्याने पीककर्ज घेण्यासही पात्र ठरतील.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘सीएससी (CSC) केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. यावेळी लाभार्थी यादीतील नावाची खात्री करून अंगठ्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे.
जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जात असून, आधार संलग्नीकरण, आधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही लाभ मिळविण्याची अत्यावश्यक अट आहे. सदर योजनेसाठी आपले सरकार सेवा केंद्र, सी एस सी केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क लागू नाही. कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र चालक किंवा सी एस सी केंद्र चालकाने शुल्क आकारू नये अशीही सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.