Take a fresh look at your lifestyle.

तुकाई उपसा जलसिंचन योजनेची कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर जिल्ह्यातील तुकाई व भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा आढावा

0

मुंबई, दि. १७ : कर्जत तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध व्हावा, यादृष्टीने तुकाई उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करावीत असे स्पष्ट निर्देश देत, मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा सिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास त्वरित सादर करावा अशा सूचना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.

विधानपरिषद सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात या दोन योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रा.शिंदे म्हणाले, तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे वन्यजीव विभागाच्या आवश्यक त्या परवानगीसह १५ जुलैच्या आत पूर्ण करुन या योजनेचा शुभारंभ याच दरम्यान व्हावा. तसेच कुकडी धरणातील पाण्याचा लाभ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळावा.

या बैठकीत तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कामांची सद्यस्थिती, आर्थिक व भौतिक प्रगती, उर्वरित कामांचे नियोजन; तसेच विद्युत, यांत्रिकी आणि स्थापत्य विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यानंतर सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत तालुक्यातील १९ गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची असून यासाठी कुकडी डाव्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकल्पाकडे लक्ष असून, प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही. त्याअनुषंगाने प्रकल्पाशी संबंधित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून, जनसामान्यांना प्रामुख्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळेल यादृष्टीने सर्व यंत्रणानी समन्वय ठेवून कालबद्ध पद्धतीने काम करावे.

तुकाई उपसा सिंचन योजनेचे एकत्रित काम भौतिकदृष्ट्या सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. पंपगृह व उर्ध्वगामी नलिकेची कामे सुमारे ९८ टक्के पूर्ण झाली असून वितरण प्रणालीची कामे ७२ टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

मिरजगाव परिसरातील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीना कालव्यातून पाणी उपसा करून १२ बंधारे भरण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पंपगृह, उर्ध्वगामी वाहिन्या, वितरण वाहिन्या, वितरण कुंड, सौर ऊर्जा निर्मिती तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जनहिताच्या दृष्टीने ही योजनाही अत्यंत महत्वाची असून, या योजनेचे सर्वेक्षण, संकल्पन, आरेखन आणि सर्व तांत्रिक बाबींसह परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्ट अखेरपर्यंत मंजूरीसाठी सादर करावा अशा सूचना सभापती प्रा. शिंदे  आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या योजनेच्या कामांचा आढावा घेताना दिल्या.

जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह पुणे वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक केशव वाबळे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुण्याचे मुख्य अभियंता नितीन दुसाने, जळगाव येथील तापी गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय दाहेदार, नाशिक येथील मृद जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता हरिभाऊ गिते, अहिल्यानगर येथील मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. वाय. गुळूमकर, नाशिक येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सु. वि. गांगुर्डे आणि वरिष्ठ अधिकारी तसेच मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळीस उपस्थित होते.