12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी बोर्डानं जारी केली नियमावली
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा राज्यात उद्यापासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरु होणार आहे. यंदा दोन वर्षांनंतर बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम (12th board exams rules and Regulations) जारी करण्यात आले आहेत. या नियमांचं काटकोरपणे विद्यार्थ्यांना पालन करावं लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया बोर्डाकडून जारी करण्यात आलेले नियम
उद्यापासून म्हणजेच 4 मार्च पासून विविध परीक्षा केंद्रांवर HSC म्हणजेच इयत्ता 12वीची परीक्षा सुरु होणार आहे. . कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, राज्य बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. शिफ्ट सकाळी 10.30 ते 2 आणि दुपारी 3 ते 6.30 पर्यंत असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी सुमारे 10 मिनिटे देण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी HSC किंवा 12वी परीक्षेत बसतील ते अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स- रोल नंबर/ जन्मतारीख वापरावी लागेल.
या नियमांचं पालन करणं असेल आवश्यक
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अनिवार्य COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या प्रवेशपत्रासोबत स्वतःचा फेस मास्क, हँड सॅनिटायझर बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे. उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची झडती घेतली जाईल आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला परवानगी दिली जाणार नाही. परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे. प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरुन खात्री करुन विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.