अर्थसंकल्पात सातारा जिल्हा एक दृष्टीक्षेप…
राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित या अर्थसंकल्पाने जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि कृषी क्षेत्राला नवी गती दिली आहे.
प्रमुख पायाभूत व शैक्षणिक तरतुदी:
-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: सातारा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज व अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय इमारतीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होणार आहेत.
-
मराठी विश्वकोश भवन: वाई येथे अद्ययावत अशा ‘मराठी विश्वकोश’ कार्यालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे. हा प्रकल्प सातारा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरेल.
-
गड-किल्ल्यांचे संवर्धन: प्रतापगड आणि अजिंक्यतारासह जिल्ह्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.
‘मधाचे गाव’ – आता राज्यभर!
महाबळेश्वर तालुक्यातील ‘मांघर’ या देशातील पहिल्या ‘मधाचे गाव’ उपक्रमाच्या यशानंतर, हा नाविन्यपूर्ण प्रकल्प आता संपूर्ण राज्यभर राबविला जाणार आहे. या उपक्रमामुळे कृषी पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक योजना:
-
नमो शेतकरी महासन्मान निधी: आता शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून वार्षिक १२ हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे.
-
पीक विमा: आता शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पीक विमा उपलब्ध होणार असून, विमा हप्त्याचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
-
कृषी योजनांचा विस्तार: ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा विस्तार करून आता शेडनेट, हरितगृह आणि आधुनिक शेती यंत्रांचा लाभ दिला जाणार आहे.
-
सौर कृषी वाहिनी: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७५ हजार रुपये वार्षिक भाडेपट्टा मिळणार आहे.
महिला व युवक कल्याण:
-
प्रवास सवलत: राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.
-
आरोग्य: ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत महिला व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
शाश्वत शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प सातारा जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणारा आहे.
संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.