Take a fresh look at your lifestyle.

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट – मंत्री पंकजा मुंडे

0

मुंबई, दि. १ जून: कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून राज्यातील पशुपालन व्यवसायाला भरभराटी आणावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.

‘कारगिल’ कंपनीने ‘सिंजेंटा फाउंडेशन इंडिया’ आणि ‘डिजिटल ग्रीन इंडिया’ यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात ‘एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम’ सुरू केला आहे. मंत्रालयात आयोजित या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्रीमती मुंडे बोलत होत्या.

विभागाचे सचिव एन. रामास्वामी, कारगिल इंडियाचे अध्यक्ष आणि कारगिल ॲनिमल न्यूट्रिशन अँड हेल्थचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रविंदर बलाईन, डिजिटल ग्रीन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी भसीन आणि सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बोराडे आदी उपस्थित होते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून पशुपालक शेतकरी आणि इतर संबंधित व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमास उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, शासनाचा नेहमीच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यावर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर राहिला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा आपल्या ग्रामीण जीवनमानाचा मुख्य कणा आहे. कारगिल, सिंजेंटा फाउंडेशन आणि डिजिटल ग्रीन यांचा हा संयुक्त उपक्रम आपल्या ‘विकसित महाराष्ट्र’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देणारा ठरेल.

तंत्रज्ञान, ‘फार्मरचॅट’सारखे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल मार्गदर्शन आणि थेट दारात पोहोचणारी ‘पशू आरोग्य मित्र’ फिरती पशुवैद्यकीय सेवा यांच्या माध्यमातून अहिल्यानगरमधील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. ‘पशू सखी’च्या माध्यमातून महिलांचा वाढणारा सहभाग ग्रामीण महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देईल. हा पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वासही श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

क्षमता बांधणी प्रशिक्षण

अहिल्यानगरमधील राहुरी, राहता आणि श्रीरामपूर तालुक्यातील २६ गावांमधील ३ हजारहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत ‘पशू आरोग्य मित्र’ (मोबाईल व्हेटर्नरी व्हॅन) च्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा पोहोचवली जात आहे. याशिवाय, १२० गावांमधील ५ हजार शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल सल्ला सेवा आणि क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दोन फिरते पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वाहनांमध्ये आधुनिक निदान साधने, औषधे आणि लसींसाठी कोल्ड-चेन सुविधा उपलब्ध असेल. यामुळे थेट शेतकऱ्यांच्या दारात वेळेवर उपचार मिळून जनावरांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. ‘डिजिटल ग्रीन’ द्वारे ‘पशू सखी’ आणि पॅरा-व्हेट्सना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित केले जाईल, जे गावोगावी जाऊन पशू पोषण, वासरांची काळजी, स्वच्छता आणि दुग्ध व्यवस्थापनाचे धडे देतील. शेतकऱ्यांसाठी फार्मरचॅट हे एआय-संचलित, आवाज आधारित प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे, जे स्थानिक भाषेत जनावरांचे आजार आणि सरकारी योजनांची माहिती देईल, अशी माहिती यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कारगिल इंडियाचे अध्यक्ष आणि कारगिल ॲनिमल न्यूट्रिशन अँड हेल्थचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रविंदर बलाईन म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेशी पशुसंवर्धन जोडलेले आहे. कारगिल गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांसोबत काम करत असून, या नव्या उपक्रमामुळे दुग्धव्यवसाय परिसंस्था अधिक मजबूत होईल.

डिजिटल ग्रीन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी भसीन आणि सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बोराडे यांनीही या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करत, हा प्रकल्प शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि हवामान-अनुकूल शेतीला चालना देण्यासाठी सहाय्यकारी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

निलेश तायडे/विसंअ