आरटीई प्रवेशासाठी उद्या अंतिम मुदत; प्रतीक्षा यादीतील १० हजार विद्यार्थ्यांना संधी
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत उद्या संपणार आहे. प्रतीक्षा यादीतील सुमारे १० हजार ८३ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अद्याप हजारो जागा रिक्त असून, प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवड यादीत एकूण ९१ हजार ५४१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ९० हजार ७५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
दरम्यान, काही पालकांनी शाळा दूर असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. मात्र, संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेतला नाही तर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाने पालकांना वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे।