‘आपुलकी’चा आधार: शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची नवी वाट
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पुढाकारातून शिक्षणाला नवे पंख

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी दिलासादायक आणि आशादायी पाऊल उचलत जिल्हा प्रशासनाने एक संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाला ‘आपुलकी’ असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले असून, यातून मुलांच्या शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत पुणे येथील ‘स्नेहवन’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील मुलांना मोफत निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आळंदी येथील निवासी शाळेत इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. सन २०१५ पासून ‘स्नेहवन’ संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत असून, अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील संबंधित कुटुंबांना आवाहन केले आहे की, इच्छुक व पात्र मुलांची नोंदणी १५ मेपर्यंत करून घ्यावी. या योजनेसाठी विद्यार्थी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असणे आवश्यक असून, प्रवेश फक्त इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.
नोंदणीसाठी इच्छुकांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे ०२५७-२२२३१८० / ०२५७-२२१७१९३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘आपुलकी’ या उपक्रमाच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होणार आहे.