तेलबिया उत्पादन वाढीसाठी ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ला वेग; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना
देशातील खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया’ (National Mission on Edible Oils – Oilseeds) राबविण्यात येत असून महाराष्ट्रात या योजनेला वेग मिळत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यावर भर देण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत सोयाबीन, भुईमूग, मोहरी, करडई, सूर्यफूल आणि तीळ या प्रमुख पिकांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देणे, मूल्य साखळी (value chain) मजबूत करणे, तसेच तंत्रज्ञानाचा प्रसार यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत काढणीनंतर प्रक्रिया सुविधा (oil extraction units) उभारण्यासाठी मदत, तसेच गोदाम बांधकामासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यामुळे शेतमालाचे साठवण व प्रक्रिया सुलभ होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळणार आहे.
या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुकांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
“तेलबिया उत्पादन वाढ, आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल” या उद्दिष्टाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे राज्यातील तेलबिया उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.