वैद्यकीय क्षेत्राला ‘ग्लोबल बूस्ट’! AI ते रोबोटिक सर्जरीपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम
महाराष्ट्राने आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय सेवेतही आपले भक्कम स्थान निर्माण केले असून, या सामर्थ्याला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी ‘पल्स-२०२६’ (PULSE – Platform for Unified Learning, Skills, Health and Education) ही भव्य आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद २७ व २८ मार्च २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या पुढाकारातून होणारी ही परिषद वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, सेवा व्यवस्थापन आणि मेडिकल टुरिझम यांना एकत्र आणणारा व्यापक मंच ठरणार आहे. देश-विदेशातील सुमारे २९०० हून अधिक तज्ञ, १३० नामांकित डॉक्टर, संशोधक, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असून, २० विविध सत्रांमधून अत्याधुनिक वैद्यकीय विषयांवर चर्चा होणार आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने शासन कार्यरत असून, ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवस्था तंत्रज्ञानाधारित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. टेलीमेडिसिन, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स, मोबाइल हेल्थ युनिट्स यांसारख्या उपाययोजनांमुळे ग्रामीण आरोग्यसेवेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
मेडिकल टुरिझमला चालना जागतिक स्तरावर वेगाने वाढणाऱ्या ‘मेडिकल टुरिझम’मध्ये महाराष्ट्राला अग्रस्थानी आणण्याचा संकल्प या परिषदेतून केला जात आहे. कमी खर्चात उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध असल्याने परदेशी रुग्णांचे आकर्षण भारताकडे वाढत असून, ‘महाराष्ट्र ब्रँड’ म्हणून वैद्यकीय पर्यटनाची ओळख निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक सर्जरी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, टेलीमेडिसिन आणि डिजिटल हॉस्पिटल व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण होणार आहे. ‘डिजी होम’ आणि ‘टेक टॉक’ या विशेष संकल्पनांद्वारे ३६० डिग्री डोममध्ये लाईव्ह व इमर्सिव्ह अनुभव दिला जाणार आहे.
शिक्षण आणि संशोधनाला चालना वैद्यकीय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख, संशोधन सादरीकरण आणि नवकल्पनांना व्यासपीठ मिळणार आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा समन्वय साधत एकात्मिक आरोग्य व्यवस्थेवरही भर दिला जाणार आहे.
गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी या परिषदेमुळे वैद्यकीय उपकरणे, जैवतंत्रज्ञान, फार्मसी आणि संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे. परिणामी रोजगारनिर्मितीला चालना मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.
एकूणच, ‘पल्स-२०२६’ ही परिषद महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी केवळ एक कार्यक्रम नसून भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचा आराखडा ठरवणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवेकडे वाटचाल करताना महाराष्ट्राला नवे बळ देणारी ही परिषद ठरणार, यात शंका नाही.