Take a fresh look at your lifestyle.

ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी; महाज्योतीतून हजारोंना प्रशिक्षण एमपीएससी-यूपीएससीत ९२ जण यशस्वी

0

राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून सध्या सुमारे ६ हजार १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असून यावर्षी एमपीएससी व यूपीएससी परीक्षांमध्ये ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बहुजन समाज कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ. परिणय फुके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री सावे बोलत होते. त्यांनी सांगितले की, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्व्हिस, मिलिटरी रिक्रूटमेंट तसेच एमबीए (सीएटी) आणि यूजीसी-नेट/सेट यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ऑफलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

महाज्योतीचे मुख्यालय नागपूर येथे असून तेथे सात मजली इमारतीचे काम सुरू आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारणी सुरू असून ज्या ठिकाणी वस्तीगृह नाही, तेथे डीबीटीद्वारे आर्थिक मदत दिली जात आहे.

यावर्षी महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नाशिकसह विभागीय स्तरावर नवीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.