Take a fresh look at your lifestyle.

‘लालपरी’च्या प्रवासाला डिजिटल कवच!

0

महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानकांपासून कार्यालयांपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा टप्पा! राज्यभरातील ‘लालपरी’च्या प्रवासाला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे संरक्षण मिळणार आहे.

परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली की, दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींचा विचार करून एसटीने ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाद्वारे बसस्थानके, आगार, कार्यशाळा, विभागीय कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांसह 633 ठिकाणी 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.

सरनाईक म्हणाले, “प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी रु. 111 कोटी मंजूर केले आहेत. हा प्रकल्प एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणार असून, प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल.”

या प्रकल्पाची अंमलबजावणी टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL) करत असून, मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबईत उभारण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील सर्व कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे आणि संशयास्पद हालचाली तात्काळ ओळखून आवश्यक कारवाई करता येईल.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, तर उर्वरित विभागांमध्ये बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सरनाईक यांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम केवळ कॅमेरे बसविण्यापुरताच मर्यादित नाही; एसटीच्या सुरक्षेला नवे डिजिटल युग देणारा ऐतिहासिक टप्पा आहे. आता ‘लालपरी’चा प्रवास केवळ वेगवान नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार आहे.