MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल; १ मार्चपासून सुधारित उत्तरपत्रिका व नवे नियम लागू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि निर्दोषता वाढवण्यासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. सुधारित कार्बनलेस उत्तरपत्रिका आता दोन प्रतींमध्ये असणार असून मूळ प्रत आयोगाकडे जमा करावी लागेल, तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत नेण्याची मुभा असेल.

नव्या नमुन्यात उत्तरपत्रिकेचा भाग-१ केवळ उत्तरे नोंदवण्यासाठी, तर भाग-२ वैयक्तिक तपशीलासाठी असेल. बैठकीचा क्रमांक आता ८ अक्षरांऐवजी ७ अंकी संख्यात्मक (Numeric) असेल आणि संपूर्ण निवड प्रक्रियेत कायम राहील.
महत्त्वाचा बदल म्हणजे चार पर्यायांऐवजी पाचवा पर्याय समाविष्ट करण्यात आला आहे. प्रत्येक प्रश्नासाठी पाचपैकी एक पर्याय निवडणे बंधनकारक असून, उत्तर न दिल्यास, एकापेक्षा अधिक पर्याय छायांकित केल्यास किंवा चुकीचे उत्तर दिल्यास २५% (१/४) गुण वजा करण्यात येणार आहेत.

तसेच काळ्या शाईच्या बॉलपेनचा वापर अनिवार्य करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन झाल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरणार आहे. ही सुधारित कार्यपद्धती १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व परीक्षा व भरती प्रक्रियांना लागू राहील.