Take a fresh look at your lifestyle.

प्रशासनातून साहित्याकडे: मराठी महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय संमेलन नवी दिल्लीमध्ये

0

नवी दिल्ली : प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पहिले ‘अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाची अधिकृत घोषणा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव तथा संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला यांनी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच ‘सरहद’चे सह-संयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते.

महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांमधील सुप्त साहित्यिक गुणांना व्यासपीठ मिळवून देणे, तसेच त्यांच्या लेखन, विचार आणि अनुभवांना राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

या संमेलनासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत आणि माजी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत असून, एकाच वेळी तीन समांतर सभागृहांमध्ये विविध उपक्रम पार पडणार आहेत. सभागृह क्रमांक १ मध्ये सामाजिक व साहित्यिक परिसंवाद, चर्चासत्रे आणि मान्यवरांच्या मुलाखती आयोजित करण्यात येतील. सभागृह क्रमांक २ मध्ये निमंत्रित कवींचे भव्य काव्यसंमेलन रंगणार आहे. तर सभागृह क्रमांक ३ मध्ये पुस्तक प्रकाशन, गझल सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या मराठी महिला शासकीय अधिकाऱ्यांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी संकेतस्थळ : sahityasammelan.sarhad.in