५ रोजी मोफत उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सातत्याने करत असून, त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ५ फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नवउद्योजक, बेरोजगार युवक-युवती तसेच स्वयंरोजगार इच्छुकांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
या मार्गदर्शन मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र, जळगावचे महाव्यवस्थापक मा. श्री. संतोष गवळी, बँक ऑफ बडोदाचे विभागीय व्यवस्थापक मा. श्री. सुनिल देशमुख, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ‘अमृत’, पुणे येथील मा. श्री. राजेंद्र कानडे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे लीड बँक मॅनेजर मा. श्री. डोहरे साहेब, स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक मा. श्री. संतोष दराडे, जिल्हा उद्योग केंद्र जळगावचे मॅनेजर मा. श्री. आर. आर. डोंगरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक मा. श्री. प्रविणसिंह साहेब, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मा. श्री. दीपक बोरसे तसेच इतर मागासवर्गीय महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मा. श्री. योगेश पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत कर्ज कसे मिळवावे, अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया व आवश्यक अटी-शर्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत (DIC) उपलब्ध असलेल्या अनुदान (सब्सिडी) योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात येणार आहे.
यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय महामंडळ तसेच ‘अमृत’ योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध कर्ज व सहाय्य योजनांची माहितीही मेळाव्यात देण्यात येईल. कर्ज प्रकरणात बँकांची भूमिका, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच कर्ज मंजुरीची कार्यपद्धती याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कोणते उद्योग व व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतात, बाजारातील संधी, तसेच व्यवसाय निवडीबाबत अचूक व व्यवहार्य मार्गदर्शन देणे हेही या मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जीपीएस मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.