प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्री-मॅट्रिक (इ. ९ वी व १० वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. ११ वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण पाटील यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग व शिष्यवृत्ती विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. तर, पीएम-वायएएसएएसव्हीआय (यंग ॲचीव्हर्स स्कॉलरशिप ॲवार्ड स्कीम फॉर व्हायब्रेट इंडिया) या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक (इ. ९ वी व १० वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. ११ वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://scholarships.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा.
अर्जासोबत जात प्रमाणपत्र, जात वैधता (लागू असल्यास), उत्पन्न प्रमाणपत्र, आधार-लिंक बँक खाते, बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार प्रमाणीकरणासह ७५ टक्के उपस्थितीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.