Take a fresh look at your lifestyle.

संपूर्ण देशात मतदार तपासणी मोहीम; महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी यादी होणार क्लीन

0

देशातील तसेच महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी पूर्णपणे अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावर एक मोठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतून मयत झालेल्या तसेच बोगस मतदारांची नावे वगळणे आहे जेणेकरून निवडणुकी निष्पक्ष वातावरणात पार पाडता येतील.

ही संपूर्ण तपासणी मोहीम स्थानिक निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मतदार यादीची अचूकता वाढवण्यासाठी आयोगाने एक महत्त्वपूर्ण आणि तांत्रिक पाऊल उचलले आहे. आता जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा थेट निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार आहे. याशिवाय आरजीआय (Registrar General of India) आणि महापालिकांचा डेटाबेस देखील आयोगाला उपलब्ध होईल.

या डेटाच्या आधारावर मयत व्यक्तींची नावे स्वयंचलित पद्धतीने मतदार यादीतून वगळली जातील. ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांच्या डेटाचा वापरही या तपासणीसाठी केला जाणार आहे. बोगस मतदारांना बाहेर काढण्यासाठी निवडणूक आयोग ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) या विशेष तपासणी मोहिमेवर जोर देत आहे.

अशीच मोहीम 25 जून 2025 पासून बिहारमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आली होती, ज्याची अंतिम यादी 30 सप्टेंबर रोजी जाहीर झाली. याच धर्तीवर आता संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात, ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष आणि विश्वसनीय मतदार यादीच्या आधारावर पार पाडण्यास मोठी मदत होणार आहे.