विद्यार्थ्यांनो, बनावट विद्यापीठांपासून राहा सावधान, प्रवेश घेण्यापूर्वी ‘अशी’ करा खात्री…
बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र याच काळात काही बनावट विद्यापीठे खोट्या जाहिराती आणि नोकरीच्या आश्वासनांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे पैसे, वेळ आणि भविष्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच कोणत्याही कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्याची योग्य खात्री करणे खूप गरजेचे आहे.
भारतातील उच्च शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी संस्था विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने याबाबत एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेण्याआधी विद्यार्थ्यांनी ugc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरील बनावट विद्यापीठांची यादी नक्की तपासावी. कायद्यानुसार फक्त यूजीसीने मान्यता दिलेले किंवा सरकारी कायद्यानुसार स्थापन झालेले विद्यापीठच पदवी देऊ शकते.
बनावट विद्यापीठांची काही धोक्याची चिन्हे ते म्हणजे जर एखादे विद्यापीठ तीन-चार वर्षांचा कोर्स एक-दोन वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन देत असेल तर तो एक मोठा धोका आहे. खूप कमी फीमध्ये 100 टक्के नोकरीची हमी देणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. बनावट संस्थांच्या वेबसाइटवर प्राध्यापक, अभ्यासक्रम किंवा कॅम्पसची माहिती अनेकदा अपूर्ण किंवा अस्पष्ट असते.
यूजीसी अशा संस्थांवर कारवाई करत असते. मार्च 2025 मध्ये त्यांनी अनेक राज्यांमधील बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली होती. जर तुम्हाला कोणत्याही संस्थेबद्दल शंका आल्यास तुम्ही ugcampc@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार करू शकता. एक योग्य निर्णय तुमच्या भविष्याची दिशा ठरवू शकतो. त्यामुळे, प्रवेश घेण्यापूर्वी थोडी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.