आधार अपडेट, UPI, LPG, बदलणारे ‘हे’ महत्त्वाचे नियम
प्रत्येक महिन्याप्रमाणे जून महिन्यातही मोठे बदल होणार असून ज्याचा तुमच्या खिशावर ताण पडणार आहे. यूपीआय, पीएफ पासून ते एलपीजी सिलेंडरच्या किमती 1 जूनपासून नियम बदलणार आहेत. यामुळे तुमचे महिन्याचे अर्थचक्र बिघडू शकते. यासोबतच तुम्हाला काही फायदे आणि सुविधा देखील मिळू शकतात. कोणते नियम बदलणार ? जाणून घेऊया.
सरकार EPFO चं 3.0 चे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. जे जुन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर तुमचा पीएफ क्लेम खूप सोपा होईल. तुम्ही ATM आणि UPI द्वारे पैसे काढू शकता. तसेच जूनमध्ये UIDAI ने दिलेली मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा संपणार आहे. त्याची अंतिम मुदत 14 जून आहे. तोपर्यंत तुम्ही आधार अपडेट केले नाही तर तुम्हाला या कामासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
जर तुम्ही कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 1 जूनपासून मोठा झटका बसू शकतो. जर या बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचे ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाले तर बँकेकडून 2 टक्के बाउन्स शुल्क आकारले जाऊ शकते. हे किमान 450 रुपये आणि जास्तीत जास्त 5000 रुपये असू शकते. 1 जून रोजी होणारा सर्वात मोठा बदल म्हणजे सीएनजी-पीएनजी आणि एटीएफचे दर बदलणार आहेत. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती तसेच एअर टर्बाइन इंधनाच्या किमतीमध्ये बदल करतात.
एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या 1 तारखेला बदलतात. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन किंमत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि लहान व्यवसायांसाठी दिलासादायक आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 24 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जूनमध्ये बँका मुदत ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरात बदल करू शकतात. कारण रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे.
सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी नवीन कट-ऑफ वेळ लागू केली आहे. हा नियम 1 जूनपासून ऑफलाइन व्यवहारांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर दिलेल्या ऑर्डर पुढील कामकाजाच्या दिवशी ग्राह्य धरल्या जातील. एनपीसीआयने यूपीआय संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे. यूपीआय पेमेंट करताना वापरकर्त्याला फक्त प्राप्तकर्त्याचं बँकिंग नाव दिसेल. क्यूआर कोड किंवा एडिट केलेले नाव यापुढे दिसणार नाही.