Take a fresh look at your lifestyle.

RTI प्रवेशाची सोडत जाहीर पालकांना पासून मॅसेज पाठवले जाणार…

0

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या (एससीईआरटी) कार्यालयात शिक्षण विभागाचे अधिकारी, पत्रकार, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांची माहिती पालकांना मेसेजद्वारे १४ फेब्रुवारीपासून पाठविण्यात येणार आहे.

आरटीई ऑनलाइन सोडतीसाठी नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिट्ट्यांद्वारे क्रमांक काढले. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधक परिषदेचे संचालक राहुल रेखावार, योजना संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे आदी उपस्थित होते.

यंदा शाळा कमी झाल्या असल्या, तरी प्रवेश क्षमतेत पाच हजारांनी वाढ झाली आहे. ऑनलाइन सोडतीची माहिती आता राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) कार्यालयाला पाठविण्यात आली असून, त्याआधारे एनआयसीकडून मुलांच्या प्रवेशाची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुलाचा प्रवेश जाहीर झाला असल्यास त्याची माहिती पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेजद्वारे देण्यात येईल, अशी माहिती गोसावी यांनी दिली.

खासगी शाळांनी मुलांचे प्रवेश नाकारल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरटीई प्रवेशाचे प्रलोभन दाखवणाऱ्या एजंटांवरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पालकांनी पुढे येत संबंधित शाळा किंवा व्यक्तींची माहिती शिक्षण विभागाला द्यावी. -सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त