राज्यातील ZP भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर…
या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली होती. या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
या अधिकाऱ्यांची दोन दिवशीय कार्यशाळा २८ आणि २९ एप्रिल २०२३ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संभाव्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांची संख्या, एकूण गुण, परीक्षेसाठीचा कालावधी आजी मुद्यांवर मंथन करण्यात आले होते.

सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून कर्मचाऱ्यांच्या १८ हजार ९३९ जागा रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांची सन २०१६ पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरु केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या होत्या.
लेखी परीक्षेचे स्वरूप:– जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांच्या कर्मचारी भरतीसाठी संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे. त्यानुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढली जाईल. संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतील.
परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी व संबंधित पदांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न असतील. शासनाने गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. रिक्त पदे १५ ऑगस्टपूर्वी भरण्याची शासनाची सूचना आहे.
परीक्षेसाठी चार प्रकार निश्चित:– परीक्षेसाठी इंग्रजी (इंग्रजी माध्यम) विषयासाठी १५ प्रश्न (३० गुण), मराठीसाठी (मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), सामान्य ज्ञान (इंग्रजी व मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), गणित, बुद्धिमापन (इंग्रजी व मराठी माध्यम) १५ प्रश्न (३० गुण), तांत्रिक विषय (इंग्रजी/इंग्रजी व मराठी माध्यम) ४० प्रश्न (८० गुण), असे १०० प्रश्न परीक्षेसाठी असतील.
त्यासाठी २०० गुण निश्चित करण्यात आले आहेत. भरतीसाठीच्या परीक्षेत चार प्रकार निश्चित आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब १, ब २ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयांशी संबंधित प्रश्न असतील. त्यात प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. यासाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहीर केले आहे.