अग्निपथ योजनेत होणार मोठे बदल; ५० टक्के अग्निवीरांना कायमस्वरुपी सैन्यात घेणार…
गेल्या वर्षी केंद्र सरकारने अग्निपथ ही महत्त्वाकांक्षी योजना लाँच केली होती. या माध्यमातून तरुण-तरुणी अग्निवीर म्हणून चार वर्षांसाठी सैन्यात सहभागी होऊ शकतात. या योजनेत आता बदल करण्याची मागणी भारतीय सैन्याने केली आहे. चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या ५० टक्के अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरुपी घेण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांपैकी २५ टक्के अग्निवीरांनाच कायमस्वरुपी नोकरीचा पर्याय देण्यात येतो. मात्र, यात बदल करण्याची मागणी भारतीय सेनेने केली आहे.
भारताच्या सैन्यदलात दर वर्षी सुमारे ८० हजार सैनिकांची भरती होत होती. मात्र, कोविड महामारीमुळे दोन वर्षं ही भरती झालेली नाही. मात्र या दोन वर्षात कित्येक सैनिक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सैन्याच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
ही घट भरून काढण्यासाठीच लष्कराकडून अग्निवीर योजनेत बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ५० टक्के अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरुपी घेण्याचा विचार करावा, तसेच अग्निवीरांच्या संख्येत वाढ करून, ही भरती वेगाने करावी अशा मागण्या लष्कराने केल्या आहेत.

सध्या ४० हजार अग्निवीरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दर वर्षी ही संख्या वाढवण्यात येणार आहे. २०२६ पर्यंत एकूण १ लाख ७५ हजार अग्निवीर सैन्यात दाखल होतील असं लक्ष्य आहे. मात्र, आतापासूनच सैन्यात सुमारे दीड लाख सैनिकांची कमतरता आहे.
टेक्निकल भरती:– एव्हिएशन, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा तांत्रिक क्षेत्रामध्ये कुशल सैनिकांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. सध्या अग्निवीर भरतीसाठीची वयोमर्यादा १७.५ ते २१ वर्षे एवढी आहे. यामुळे टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे अग्निवीर मिळणं अशक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुशल अग्निवीरांची संख्या वाढवण्यासाठी भरतीची कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्याबाबत देखील विचार सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितंल.