आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे समर एंन्ट्रन्सशिपचा अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे समर एन्ट्रन्सशिप प्रोग्रॅम २०२३ चे आयोजन केले आहे. याअंतर्गत उन्हाळी सुट्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची, कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १० मेपर्यंत आहे.
आरोग्य विद्यापीठातर्फे याबाबत सूचनापत्र जारी करण्यात आले असून पात्रतेच्या अटींसह अन्य तपशील जारी केलेला आहे. त्यानुसार उन्हाळी सत्रातील सुट्यांमध्ये राज्यभरातील एसआयपी सेंटर येथे ही योजना राबविली जाणार आहे.
पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. येत्या १० मेपर्यंत इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी पाचशे रुपये शुल्क असणार आहे.
निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शुल्काचा परतावा दिला जाणार आहे. दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. तर विद्यापीठाच्या आविष्कार स्पर्धेतील बक्षीस विजेत्या विद्यार्थ्यांना शुल्काचा परतावा दिला जाणार आहे.
विद्यावेतन, प्रमाणपत्रही:- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील संशोधन करण्यास मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. समर एन्ट्रान्सशिप प्रोग्रॅममध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान दोन तर कमाल चार आठवड्यांसाठी अध्ययन केले जाणार आहे.

या विद्यार्थ्यांना प्रती आठवडा अडीच हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाणार आहे. कमाल चार आठवड्यांचे विद्यावेतन दिले जाणार असल्याचे सूचनापत्रात म्हटले आहे. यशस्वीरीत्या शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 10 मे 2023