Take a fresh look at your lifestyle.

सातारा मेडिकल कॉलेजमध्ये 204 पदांची भरती होणार

0

सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये बाह्यस्त्रोतांतून तब्बल 204 पदांची भरती होणार आहे. यात ‘क’ व ‘ड’ संवर्गातील कुशल, अर्धकुशल व अकुशल पदांचा समावेश आहे. या पदांचा सर्व खर्च कंत्राटी सेवांतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून होणार आहे. यात 139 कुशल, 41 अर्धकुशल, तर 24 अकुशल वर्गातील पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून निविदा काढण्यात येणार आहे. ही सर्व पदे ठेकेदारी तत्त्वावर भरली जाणार आहेत.

कुशल पदांमध्ये दोन छायाचित्रकार, दोन कलाकार, चार ग्रंथालय सहायक, चार कोडिंग क्लार्क, नऊ कनिष्ठ लिपिक, 46 तंत्रज्ञ, 20 प्रयोगशाळा सहायक, दहा वैद्यकीय समाजसेवक, एक सुतार, एक प्लंबर, चार वाहनचालक, 22 लघुलेखक, आठ लघुटंकलेखक, दोन आरोग्य प्रचारक, चार आरोग्य निरीक्षक अशी कुशल पदे 139 आहेत, तर अर्धकुशलमध्ये 36 सफाई कामगार, चार धोबी, एक हमाल अशी 41 पदे, अकुशलमध्ये चार दप्तरी व 20 शिपाई पदांचा समावेश आहे.

या पदांच्या भरतीसाठी पुरवठादारांकडून निविदा मागवल्या जाणार आहेत. त्यामध्येही अनेक अटी—शर्तींचा समावेश केला आहे.

ही पदे नियमित शासननिर्णयानुसार भरली असती, तर जेवढा खर्च झाला असता त्यापेक्षा 20 ते 30 टक्के बचत होणे आवश्यक आहे.ही सर्व पदे बाह्य स्त्रोतातून भरायची असल्याने या पदांना कंत्राटी सेवांतर्गत पदे असे म्हटले जाणार आहे. यासाठी होणारा सर्व खर्च कंत्राटी सेवांतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून केला जाईल.

राज्यातील 27 वैद्यकीय महाविद्यालयांतून या पद्धतीने पाच हजार 56 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी वार्षिक 109.52 कोटी रुपये खर्च होणार आहे.