Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार RTE प्रवेश

0

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी (दि.1) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झाली आहे. दि. 17 मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून मुदतीनंतर कुठल्याही अर्जाची दखल घेणार नसल्याच्या सक्त सूचना शिक्षण विभागाने दिल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.

दुर्बल वंचित घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पालकांना https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.

शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया भरण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

त्यानुसार करोना काळात म्हणजे एक एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दोन्ही पालक अथवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना यंदा या प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर मदत केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आरटीई प्रवेशासाठी जन्म तारखेचा पुरावा- जन्मदाखला, पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन, निवासी पुरावा- रेशन कार्ड, वाहन परवाना, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचा अथवा बालकांचा जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागणार आहेत.