संजय गांधी निराधार योजना
संजय गांधी निराधार योजनेमध्ये शासनाकडून 600 रुपये प्रतिमाह इतके अनुदान दिले जाते. या योजनेसाठी ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21 हजार रुपयांपर्यंत आहे. ज्याचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा अंध, अपंग, शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, सिकलसेलग्रस्त, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, अत्याचारित महिला, तृतीयपंथी, अनाथ बालके, देवदासी, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाची पत्नी, 35 वर्षे व त्यावरील निराधार अविवाहीत महिला अर्ज करु शकतात. सदरील अर्ज संबधित तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये भरुन सादर करावा.
अर्जासोबत वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व अर्जदार ज्या गटाचा असेल म्हणजे अपंगांसाठी अपंग असल्याचे प्रमाणपत्र, विधवा महिलांसाठी पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र आदी गटाची संबधित कागदपत्रे सादर करावी लागतील.
अर्जदारास मुले असल्यास, मुले 25 वर्षांची होईपर्यंत वा त्यांना नोकरी मिळेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत अर्जदारास लाभ मिळेल.ज्या अर्जदाराला फक्त मुली असतील अशा लाभार्थ्यांच्या बाबतीत मुलीचे वय 25 वर्षे झाले वा त्या लग्न होऊन नांदावयास गेल्या तरी सुध्दा लाभ चालू ठेवण्यात येईल.
एखाद्या कुटुंबात एका पेक्षा अधिक व्यक्तींनी अर्ज केला असेल व ते सर्व अर्ज मंजूर झाले असतील तर अशा कुटुंबात मात्र एकत्रित मासिक अर्थसहाय्यता 900 रुपये मिळतील.